प्रतिनिधी / बेळगाव
मूळचे मलतवाडी (ता. चंदगड), सध्या भाग्यनगर, अनगोळ येथील रहिवासी, टिळकवाडी येथील बालिका आदर्श विद्यालयाचे सहशिक्षक, कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील (वय 49) यांचे रविवार दि. 23 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेचे सचिव तर चंदगड तालुका को-ऑप. सोसायटीचे ते चेअरमन होते. त्यांनी शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव काम केले आहे. शिक्षक आमदार अरुण शहापूर यांचे ते निकटवर्तीय होते. त्यांच्या प्रयत्नांतून अनेक शिक्षकांचे व शिक्षण संस्थांचे प्रश्न मार्गी लागले.
लक्षवेधी या सांस्कृतिक ग्रुपच्या माध्यमातून सर्व शाळांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना घेऊन त्यांनी 500 हून अधिक गाण्यांचे कार्यक्रम केले. अनेक सांस्कृतिक संस्थांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. मराठी माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे यासाठी ते सतत आग्रही होते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने शिक्षण क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.