प्रतिनिधी/ बेळगाव
वडगाव परिसरात नाझर कॅम्प येथे एकमेव बालोद्यान आहे. पण या उद्यानाची दुरवस्था झाली असून उद्यानाचा वापर बालकांना खेळण्यासाठी होण्याऐवजी जनावरांना चारण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे बालोद्यान की जनावरांचे कुरण, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. तसेच रात्रीच्या वेळी मद्यपीची गर्दी होत असल्याने बालोद्यानला मद्यपी उद्यानाचे स्वरूप आले असल्याने परिसरातील रहिवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
उद्यानात जायचे म्हटल्यानंतर लहान मुलांचा आनंद द्विगुणीत होतो. उद्यानात खेळण्याचा आणि मौजमस्ती करण्याचा आनंदच वेगळा असतो. यामुळे मुले उद्यानात जाण्याचा हट्ट करतात. हा हट्ट पुरविताना उद्यानात निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करावा लागत आहे. शहर स्मार्टसिटी बनवित असताना विविध ठिकाणी असलेली उद्याने स्मार्ट बनविण्यासाठी कोटय़वधी निधीची तरतूद करण्यात येत आहे. स्मार्टसिटीमधून करण्यात येणाऱया उद्यानाच्या विकासाचे श्रेय लाटण्याचा प्रकारदेखील सुरू आहे. पण वर्षानुवर्षे दुरवस्था झालेल्या वडगाव परिसरात एकमेव असलेल्या बालोद्यानाचा विकास करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. एरव्ही विकासकामे राबविल्याच्या गप्पा मारणाऱया मनपाच्या अभियंत्यांनी याकडे कानाडोळा केला आहे. केवळ स्मार्टसिटी योजनेमधून उद्यानाकरिता कोटय़वधी निधी खर्चून विकास करण्यात येत आहे. दक्षिण विभागात असलेल्या बहुतांश उद्यानांची दुरवस्था झाली असून यापैकीच वडगाव नाझर कॅम्प येथील बालोद्यान आहे.
बालोद्यान म्हणजे कचराकुंडी बनले असून खेळाचे साहित्य खराब झाल्याने उद्यानात गवत वाढत असल्याने जनावरांना चारण्यासाठी उद्यानाचा वापर केला जात आहे. उद्यानाच्या तिन्ही बाजूने कचरा टाकला जात आहे. तसेच मद्यपीवर पोलीस प्रशासनाचा कोणताच वचक नसल्याने रात्रीच्यावेळी उद्यानात बसून मद्यपान करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे परिसरात मद्याच्या रिकाम्या बाटल्या, पाकिटे आणि ग्लास टाकण्यात आले आहेत. याठिकाणी असलेल्या खुर्च्या खराब झाल्या असून खेळाच्या साहित्याची मोडतोड झाली आहे. उद्यानातील पाळणेच गायब झाले असल्याने केवळ सांगाडे शिल्लक राहिले आहेत. जवळ पाण्याची सुविधा असूनदेखील उद्यान ओसाड बनले आहे. या परिसरात एकच उद्यान असल्याने विकास करून विविध खेळांचे साहित्य बसविण्यात यावे तसेच उद्यानात लॉन व झाडे लावून परिसर हिरवागार करून मुलांसाठी चांगले उद्यान उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे..