मुंबई \ ऑनलाईन टीम
राम मंदिराच्या मुद्द्यावरुन काल, बुधवारी भाजप युवा मोर्चाने शिवसेना भवनावर मोर्चा काढला. यानंतर शिवसैनिक आणि आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यानंतर भाजपनेकाही शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसह महिला पदाधिकाऱ्यांनाही मारहाण केल्याचा आरोप केला आहे. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ ट्विट करत अंगावर याल, तर शिंगावर घेऊच, असा इशारा भाजपला दिला आहे.
कालच्या घडलेल्या प्रकारनंतर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना भाषणाचा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे. कारण नसताना कानफाडात माराल तर तुम्ही म्हणाल की, वा छान मस्त बसली. अजून जोरात मारायला हवी होती. इतका बुळचटपणा बरा नाही. त्याचा फटकन आवाज आला तर आपला काडकन आवाज आला पाहिजे, तोच शिवसैनिक. नुसत्या टाळ्या मारण्यासाठी हात नको, कानफाडात मारण्यासाठी ते तयार ठेवा, अशा शब्दात शिवसैनिकांना आक्रमक राहण्याची सूचना बाळासाहेब ठाकरे या व्हिडिओमध्ये देताना दिसत आहे. किशोरी पेडणेकर यांनी देखील हा व्हिडिओ शेअर करत भाजपला देखील हाच इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे.
अयोध्येतील राम मंदिर उभारणीमधील कामात जमीन खरेदी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला असून यावरुन शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजप संतापली आहे. शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भाजप जनता युवा मोर्चाकडून काल, बुधवारी आंदोलन करण्यात आल्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा वाद झाला. शिवसेना भवन परिसरात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. परिणामी पोलिसांना बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली आहे. या सर्व प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप अशी मालिका शिवसेना व भाजप नेत्यांमध्ये सुरू झाली आहे.