मुंबई / ऑनलाईन टीम
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडणार आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मात्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या सोहळ्याचे आमंत्रण नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भाजप नेते नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत!.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज (31 मार्च) पार पडणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी पार्क येथील महापौरांचे जुने निवासस्थान या स्मारकाची नियोजित जागा आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. याचा विचार करता हा सोहळा ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थितीत राहणार आहेत.