ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईतील बंगल्यात आता कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात हे सध्या होम क्वारंटाईन झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, थोरात यांच्या बंगल्यावरचा टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर बाळासाहेब थोरात हे होम क्वारंटाईन झाले आहेत. टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची बाधा झाल्यावर बंगल्यातील सर्व कर्मचारी आणि संपर्कात आलेल्या अन्य 20 लोकांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली आहे. थोरात हे मुंबईतच असून त्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीसाला कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षा ताफ्यातील पोलीस आणि त्यांच्या वाहन चालकालाही कोरोनाची लागण झाली होती.
दरम्यान, यापूर्वी राज्यातील महाविकासआघाडीतील राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबत काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झालेली. या तिन्ही मंत्र्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.