प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-बागलकोट रोडवरील बाळेकुंद्री खुर्दजवळ दोन कारची धडक होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री हा अपघात झाला होता. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र मंगळवारी त्याचा मृत्यू झाला आहे.
मंजुनाथ रमेश पाटील (वय 27) रा. शिंदे कॉलनी पंत बाळेकुंद्री असे त्या तरुणाचे नाव आहे. बाळेकुंद्री खुर्द येथील जैन ऑटोजवळ इर्टिगा कार क्र. केए 22 झेड 4592 आणि कार क्र. एमएच 02 एबी 2606 यामध्ये धडक झाली. त्यामध्ये मंजुनाथ हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी बेळगावकडे हलविले असता उपचाराचा उपयोग न झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
मंजुनाथच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या घटनेची नोंद मारिहाळ पोलीस स्थानकात झाली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले असून गुरुवारी सकाळी 8 वा. रक्षाविसर्जन होणार आहे.