पद्मा कोला यांची उपाध्यक्षपदी निवड
वार्ताहर / बाळेकुंद्री
बाळेपुंद्री खुर्द येथे शुक्रवारी अत्यंत चुरशीच्या झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी श्रीमती रेणुका मल्लिकार्जुन करवीनकोप्प यांची तर उपाध्यक्षपदी पद्मा कोंडय्या कोला यांची निवड झाली आहे. निवडणूक दुपारी 12 वाजता ग्राम पंचायत कार्यालयात पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून बेळगांवचे कृषी अधिकारी श्रीकांत गवी यानी काम पाहिले. ग्राम पंचायत कार्यालयात झालेल्या या निवडणुकीत महिला अ वर्गासाठी अध्यक्ष तर सामान्य महिलासाठी उपाध्यक्ष पद राखीव होते. निवडणूक अधिकारी गवी यांनी निकाल जाहीर करताच कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी विजयी उमेदवारांनी गावात पदयात्रा काढून देवदेवतांना पुष्पहार अर्पण केले. नूतन अध्यक्षा रेणुका करवीनकोप्प म्हणाल्या, ग्राम पंचायतीच्या विकासांसाठी सर्वांनी एकत्रित येऊन सर्वांच्या सहकार्याने विकासकामांना प्राधान्य देण्यात येणार असून गावातील मूलभूत समस्यांचे निराकरन करण्यासाठी सर्व सदस्यांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यानी याप्रसंगी सांगितले. युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गावातील प्रमुख गल्लीतून गुलालाची व फटाक्याची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.