क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
पणजी जिमखानाने आयोजित केलेल्या मेंबर्स लीग टी-20 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत एलपीके एकादश संघाने एलिमिनेटर -2 (उपान्त्य) लढतीसाठी प्रवेश मिळविला आहे. तिथे त्यांची लढत धेंपो चॅलेंजर्स संघाविरूद्ध होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रेस्कॉन पँथर्स संघाने यापूर्वीच अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. काल झालेल्या सामन्यात एलपीके एकादश संघाने बाळे टायगर्स संघाचा 3 विकेट्सनी पराभव केला.
पणजी जिमखानाच्या बांदोडकर मैदानावर प्रथम फलंदाजी करताना बाळे टायगर्स संघाने निर्धारीत 20 षटकात आपल्या डावात 6 बाद 152 धावा केल्या. त्यांच्या कपिल आंगलेने 29 चेंडूत 6 चौकारांनी 36, परेश मिस्कीनने 15 चेंडूत 23, रोहित मेहताने 16, साईराज धोंडने 24 चेंडूत तीन चौकार व एक षटकार ठोकून 30 तर साहिश म्हांबरेने 8 चेंडूत दोन चौकारांनी 15 धावा केल्या. एलपीके एकदाशच्या सिद्धार्थ घाणेकरने 22 धावात 1 तर विनय पालेकरने 11 धावात 1 गडी बाद केला.
उत्तरादाखल, एलपीके इलेव्हन संघाने 19.4 षटकात 7 बाद 154 धावा करून सहज विजय नोंदविला. त्यांच्या कप्तान अनुप कुडचडकरने 12 चेंडूत तीन चौकार व चार षटकारांनी 36, देविदास खोलकरने 39 चेंडूत दोन चौकार व एक षटकाराने 39, सचिन सरदेसाईने 18, सिद्धार्थ घाणेकरने 10 चेंडूत एक चौकार व दोन षटकारांनी 22 तर अनीश पै काकोडेने 10 धावा केल्या. बाळे टायगर्ससाठी सुदिन कामतने 8 धावात 2, सुश्रृत नास्नोडकरने 10 धावात 1 तर साईराज धोंडने 28 धावात 1 गडी बाद केला. या सामन्यात सामनावीर पुरस्कार एलपीके एकादशच्या सिद्धार्थ घाणेकरला प्राप्त झाला.