चिपळुणातून सुटली खास रेल्वे, दापोली, खेड, मंडणगडमधील मजुरांना झाला फायदा
प्रतिनिधी/ चिपळूण
अनेकांच्या मदतीचा हात मिळाल्याने सुखरूप प्रसुती झालेली शहरातील गांधारेश्वर परिसरात झोपडपट्टीत राहणारी उत्तरप्रदेशमधील ललीतपूर येथील सरोजराणी सेहरीया ही महिला बुधवारी आपल्या बाळासह रेल्वेतून गावाकडे रवाना झाली. या रेल्वेतून 1320जण आपल्या मूळगावी परतले असून त्यांची प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती.
अर्जून सेहरिया हा पत्नी सरोजराणी, तीन वर्षाचा मुलगा व अन्य नातेवाईकांसह गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील गांधारेश्वर परिसरात झोपडपट्टीत रहात होता. मजुरीची कामे करून कुटुंब चालवत असतानाच त्याच्यासह अनेक मजुरांवर सध्या कारोनाच्या संकटामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना प्रशासनाने वेळोवेळी मदतीचा हात दिला. मात्र अर्जूनपुढे पत्नी गरोदर असल्याने तिची प्रसुती कशी होणार, हा मोठा प्रश्न होता. याचदरम्यान सेहरिया कुटुंबासह तेथे राहणाऱया अन्य कुटुंबियांना चिपळूण महाराष्ट्र बँक शाखेत सेवेत असलेल्या वालोपे येथील आशा सुहास लोवलेकर यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या सहकार्यामुळे काही दिवसांपूर्वी सरोजराणी हिची सुखरूप प्रसुती झाली. तिने मुलाला जन्म दिला. तिला कामथे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हे कुटुंब काम करीत असलेल्या ठेकेदाराने त्यांना गावी जाण्यासाठी 24 जूनचे तिकीटही निश्चित केले होते. मात्र प्रशासनाने बुधवारी खास रेल्वेची व्यवस्था केल्याने सरोजराणीला मंगळवारी घरी सोडण्यात आले. ती बुधवारी दुपारी बाळ व कुटुंबासह येथील मध्यवर्ती बसस्थानकात आली. यावेळी तहसीलदार जयराज सूर्यवंशी, निवासी नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी एका कक्षात बाळ-बाळंतीनीची व्यवस्था केली होती. तिला जेवण देऊन त्यानंतर एसटीमधून वालोपे येथे नेण्यात आले. तेथून ती रेल्वेतून गावाकडे रवाना झाली.
1320जण गेले गावाला
चिपळुणातून 390 तर खेड, दापोली, मंडणगड येथून मिळून 1320 जण या रेल्वेने गावाकडे रवाना झाले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी करत त्यांना जेवण देऊन येथून मार्गस्थ करण्यात आले. गाडीतील व्यवस्थेपेक्षा अधिक मजूर झाल्याने उर्वरितांसाठी पुन्हा 28 मे रोजी दुसरी रेल्वेगाडी सोडण्यात येण्याची शक्यता आहे.
अन सरोजराणीच्या डोळयातून पाणी आले….
इतके दिवस सरोजराणीसह अन्य कुटुंबियांना मदतीचा हात देणाऱया आशा लोवलेकर या बुधवारी दुपारी तिला भेटण्यासाठी येथील आगारात आल्या. यावेळी त्यांना पाहून तिच्या डोळय़ातून पाणी आले. तसेच बसमध्ये बसलेल्या अन्य व्यक्तींनी लोवलेकर यांना धन्यवाद दिले.