लाईन बाजार, मराठा कॉलनीला दिलासा, आयजीएमतील पॉझिटिव्ह रूग्ण सीपीआरमध्ये
प्रतिनिधी/कोल्हापूर
साताऱयाहून अॅम्ब्युलन्समधून आलेली कसबा बावडय़ातील वृद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले, त्यानंतर ती रहात असलेला मराठा कॉलनी परिसर नाकाबंदी करून तेथे स्वच्छता मोहीम, रूग्ण तपासणी मोहीम गतीमान झाली. या पॉझिटिव्ह वृद्धेचा दुसरा स्वॅब रिपोर्टही निगेटिव्ह आला. त्यामुळे लाईन बाजार परिसराला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी मिरज येथून 41 जणांच्या स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमधील पॉझिटिव्ह रूग्णाला सीपीआरमध्ये दाखल केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
कसबा बावडा मराठा कॉलनी येथील 62 वर्षीय महिला 22 मार्च रोजी सातारा जिल्हय़ात गेली होती. ती फलटण तालुक्यातील गिरवी आणि कोरोगाव तालुक्यातील बनवडी येथे काही दिवस नातेवाईकांकडे राहिली. दरम्यान, तिचा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाशी संपर्क आला. तिला टीबीचा त्रास आहे. तिला कोरेगाव येथून कोणीतरी सातारा येथे राष्ट्रीय महामार्गावर आणून सोडले. यावेळी पुण्याहून कोल्हापूरकडे येणाऱया ऍम्ब्युलन्समधून ती आपल्या कसबा बावडा येथील घरी पोहोचली. 27 मार्चला ती घरी आली. सायंकाळी तिने स्थानिक डॉक्टरांना आपली प्रकृती दाखवली. 28 मार्चला तिला सीपीआरमधील कोरोना वॉर्डमध्ये दाखल पेले होते. तिचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर आयसोलेटेड वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. कोरोंटाईन दरम्यान तिचे दोन्ही स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आली. त्यामुळे मराठा कॉलनी परिसराला दिलासा मिळाला आहे.
इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णाला रात्री उशिरा सीपीआरमधील स्पेशल वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. सोमवारी पाठवलेल्या स्वॅबपैकी 41 जणांचे स्वॅब रिपोर्ट मंगळवारी सकाळी निगेटिव्ह आल्याची माहिती सीपीआर प्रशासनाने दिली.