बगाड मिरवणूकीला भाविक व यात्रेकरूंची गर्दी : भैरवनाथाचे बगाड यात्रा उत्साहात
प्रतिनिधी/ वाई
‘काशीनाथाचं चांगभलं’ च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत साताऱयातील बावधन (ता. वाई) येथील भैरवनाथाचे बगाड यात्रा उत्साहात पार पडली. सकाळी दहाच्या सुमारास बगाडय़ाला बगाडावर चढवून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली.
मागील दोन वर्षापासून बगाड यात्रा यात्रेवर काही बंधने होती. 2020 मध्ये टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वीच बगाड यात्रा झालेली होती, तर मागील वर्षीच्या यात्रेला करोना प्रादुर्भावामुळे बंदी घातलेली असतानाही गावकऱयांनी परंपरा खंडीत होण्याच्या भीतीने गनिमीकाव्याने बगाड मिरवणूक काढून यात्रा साजरी केली होती. यावर्षी खुल्या वातावरणात बगाड यात्रा भरत असल्यामुळे गावकऱयांमध्ये मोठा उत्साह आहे. बगाड मिरवणूक पाहण्यासाठीही मोठय़ा संख्येने यात्रेकरू जमा झाले होते. सर्व शिवार आणि रस्ते बगाड ओढणारे बैल आणि यात्रेकरू ग्रामस्थांच्या गर्दीने फुलून गेले.
होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधन (ता. वाई) येथील भैरवनाथ मंदिरात यावर्षीचा बगाडय़ा निवडण्यासाठी मोठय़ा संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. या वर्षीचा बगाडाचा मान बाळासाहेब मांढरे यांना मिळाला. मागील पाच दिवसापासून ते गावातील सर्व मंदिरात पूजा करून मंदिरातच मुक्कामाला असतात. सोमवारी रात्री बावधन येथे शेकडो ढोल ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत मोठी शाही छबिना मिरवणूक निघाली होती. या छबिण्यात मोठय़ा संख्येने ग्रामस्थ व यात्रेकरू सहभागी झाले होते.
यावर्षी करोना निर्बंध उठल्यानंतर यात्रा होत असल्याने यात्रेसाठी हजारो भाविक व यात्रेकरूंनी बगाड यात्रा पाहण्यासाठी आलेल्यांची मोठी गर्दी केली होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, वाईच्या पोलीस उपाधीक्षक गणेश किंद्रे, डॉ. शितल जानवे-खराडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, आनंदराव खोबरे, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, रवींद्र तेलतुंबडे, अमोल माने, कृष्णराज पवार आदींच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त याठिकाणी नेमण्यात आला होता. सातारा जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय पथक याठिकाणी दाखल होते. वाई-सातारा रस्त्यावर विविध खाद्य पदार्थ, खेळण्यांची दुकाने लागली आहेत. यात्रेत किरकोळ दुखापत वगळता यात्रा सुरळीत पार पडली.