शिंपणे उत्सवावर दुःखाचे सावट
संगमेश्वर : प्रतिनिधी
बावनदीवर बुडून मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह ग्रामस्थ व पोलिसांनी घेतलेल्या शोध मोहिमेत आढळून आले आहेत. परचुरी येथील शिंपणे उत्सवादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोहायला गेलेले दोघेजण बेपत्ता होऊन बुडाल्याचे समजताच ग्रामस्थांनी संपूर्ण रात्रभर शोध मोहीम राबवली.
परचुरी कळंबटेवाडी येथील प्रमोद रामचंद्र कळंबटे (35, रा. परचुरी कळंबटेवाडी) आणि शेजारी राहणारा संकेत सहदेव कळंबटे (12) यांच्यासह सातजण परचुरी येथील बावनदीमध्ये शनिवारी दुपारी 1.30 च्या दरम्यान पोहायला गेले असताना प्रमोद व संकेत यांचा नदीत बुडून मृत्यू झाला.