मुलाविरोधात पोलिसांकडून 25 हजारांचे इनाम
उत्तरप्रदेशचा बाहुबली नेता अतीक अहमदच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. अतीक अहमदच्या मुलासमवेत अन्य 7 जणांच्या विरोधात उत्तरप्रदेश पोलिसांनी हत्या आणि खंडणीवसुलीप्रकरणी प्रत्येकी 25 हजार रुपयांचे इनाम घोषित केले आहे. हे इनाम अतीक अहमदचा सर्वात धाकटा मुलगा अलीवर घोषित करण्यात आले आहे.
अतीकच्या मुलावर हत्येचा प्रयत्न आणि खंडणीवसुलीसमवेत अनेक आरोप आहेत. एका व्यापाऱयाकडून 5 कोटींची खंडणी मागितल्यावर अली चर्चेत आला होता. अतीक अहमद सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात कैद आहे.
अलीच्या विरोधात 21 डिसेंबर रोजी प्रयागराजच्या करेली पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला होता. तेव्हापासून अली फरार आहे. एकेकाही उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये बाहुबली अहमदचे वर्चस्व होते, परंतु यंदा तो निवडणुकीच्या मैदानातून बाहेर आहे.
1989-2017 पर्यंत अतीक अहमद आणि त्याचे कुटुंबातील लोक प्रयागराजमधून निवडणूक लढवत राहिले. तीन दशकांमध्ये पहिल्यांदाच अतीक अहमद किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत नसल्याची स्थिती आहे. परंतु तुरुंगात असताना अतीकने असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनमध्ये प्रवेश केला होता. 1989 मध्ये अतीक अहमद प्रयागराज पश्चिम मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आला होता. त्यानंतर तो सप, अपना दलाच्या तिकीटावर निवडणुकीच्या मैदानात उतरून विजयी होत विधानसभा तसेच संसदेत जात राहिला होता.