निषाद पक्षाने नाकारली होती उमेदवार
उत्तरप्रदेश निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. याचदरम्यान ज्ञानपूरचे बाहुबली आमदार विजय मिश्रा यांनी प्रगतिशील मानव समाज पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. प्रमासपचे अध्यक्ष प्रेमचंद बिंद यांनी कार्यकर्त्यांसाब्sात बैठक घेत याची घोषणा केली. विजय मिश्रा यांना तुरुंगातून निवडणूक लढविण्यास आणि उमेदवार अर्ज भरण्यासाठी एमपी-एमएलए न्यायालयाकडून अनुमतीही मिळाली आहे.
विजय मिश्रा हे ज्ञानपूर मतदारसंघाचे निषाद पक्षाचे आमदार आहेत. राज्यात निषाद पक्षाचे ते एकमेव आणि पहिले आमदार आहेत. परंतु निषाद पक्षाने त्यांच्या जागी ज्ञानपूर मतदारसंघात विपुल दुबे यांना उमेदवारी दिली आहे. यानंतर विजय मिश्रा यांचे नातेवाईक आणि समर्थकांनी प्रगतिशील मानव समाज पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतली होती.
बदलली समीकरणे
प्रगतिशील मानव समाज पक्षाने भाजपसोबत आघाडीसंबंधी चर्चा केली होती. परंतु त्यात यश आले नव्हते. या पार्श्वभूमीवर पक्षाने स्वतःचे उमेदवार उभे करण्यास सुरुवात केली आहे. या पक्षाकडून बाहुबली बृजेश सिंह हे चंदौलीतील सैयदराजा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या पक्षाचा बिंद समाजासह अतिमागास समुदायावर प्रभाव असल्याचे मानले जाते. विजय मिश्रा यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने हा पक्ष नवी समीकरणे निर्माण करू शकतो.
4 वेळा आमदार
विािय मिश्रा हे सध्या नातेवाईकाच्या संपत्तीवर कब्जा करणे आणि बलात्काराच्या आरोपाखाली आगरा तुरुंगात कैद आहेत. ते तुरुंगातूनच निवडणूक लढविणार आहेत. विजय मिश्रा हे ज्ञानपूरचे सलग चारवेळा आमदार राहिले आहेत. तीनेवळा ते समाजवादी पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले आणि 2017 मध्ये सपने उमेदवारी नाकारल्यावर निषाद पक्षाच्या वतीने त्यांनी निवडणूक लढविली होती.
17 फेब्रुवारीपर्यंत अर्ज प्रक्रिया
ज्ञानपूर मतदारसंघात सपने रामकिशोर बिंद, बसपने उपेंद्र सिंह आणि भाजप आघाडी अंतर्गत निषाद पक्षाने विपुल दुबे यांना उमेदवारी दिली आहे. येथे अंतिम टप्प्यात मतदान होणार आहे. 17 फेब्रुवारीपर्यंत येथे उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. तर 7 मार्च रोजी मतदान होणार आहे.