पूर्वांचलमध्ये लाभ होण्याची शक्यता : अखिलेश यांनी केले होते प्रयत्न
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी आमदार विनय शंकर समवेत हरिशंकर तिवारींचे कुटुंब समाजवादी पक्षात सामील झाले. याचबरोबर समाजवादी पक्षाचा पूर्वांचलमध्ये मोठय़ा ब्राह्मण चेहऱयाचा शोध पूर्ण झाला. विनय शंकर यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि विधान परिषदेचे माजी अध्यक्ष गणेश शंकर पांडे आणि माजी खासदार कुशल तिवारी यांनीही सपमध्ये प्रवेश केला आहे.
अखिलेश यादव यांनी लखनौमधील सप कार्यालयात हरिशंकर तिवारी यांच्या कुटुंबाला पक्षात प्रवेश दिला आहे. हरिशंकर तिवारी यांना मायावतींनी काही दिवसांपूर्वी बसपमधून हाकलले होते.
हरिशंकर हे एकेकाळी गुन्हेजगतातील मोठे चेहरे राहिले आहेत. 1980 च्या दशकात गुन्हय़ाच्या जगतातून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले होते. 1985 मध्ये तुरुंगातून त्यांनी गोरखपूरच्या चिल्लूपार विधानसभा मतदारसंघात विजय मिळविला होता. या मतदारसंघातून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यादरम्यान सप, बसप, भाजप आणि काँग्रेस अशा अनेक पक्षांचा त्यांनी प्रवास केला आहे.
हरिशंकर आता 88 वर्षांचे असून राजकारणात सक्रीय नाहीत. त्यांचे भाचे गणेश शंकर पांडे बसपच्या 2007 च्या सरकारच्या काळात विधान परिषदेचे अध्यक्ष झाले होते. तर पुत्र विनय शंकर तिवारी आमदार झाले होते. ज्येष्ठ पुत्र कुशल तिवारी हे खासदार राहिले आहेत.
विनय शंकर, कुशल तिवारी आणि गणेश शंकर यांना काही दिवसांपासून बसपमधून बाहेर काढण्यात आले होते. सपमध्ये प्रवेश करण्यासंबंधी अखिलेश यांच्याशी बोलणी केल्यानेच बसपने कारवाई केली होती. तिवारी कुटुंबाच्या प्रवेशामुळे समाजवादी पक्षाला ब्राह्मण मतपेढी आकर्षित करण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे.