दोन दिवसात चोरीचा छडा : सातारा तालुका डीबीची कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
सैदापूरच्या गावच्या हद्दीत सातारा ते कोंडवे रस्त्यावर हॉटेल जायकाशेजारी असलेली बिअर शॉपी फोडून 23 हजार 520 रुपयांच्या बिअरच्या बाटल्या तसेच चार हजार रुपयांची रोकड चोरणाऱया तीन सराईत चोरटय़ांना सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱयांनी जेरबंद केले आहे. केवळ दोनच दिवसात या चोरीचा तपास लावण्यात पोलीस यशस्वी ठरले आहेत. या चोरटय़ांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अर्जुन नागराज गोसावी (रा. सैदापूर, ता. सातारा), विपूल तानाजी नलवडे (रा. करंजेपेठ, सातारा) व ओंकार पिलाजी पवार (रा. रणदुल्लाबाद, ता. कोरेगाव) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. दि. 16 रोजी सैदापूर ता. सातारा गावचे हद्दीत सातारा ते कोंडवे जाणारे रोडवरील लकी बियर शॉपी अज्ञात चोरटयांनी फोडून त्यातून बियरच्या बॉटल व चिल्लर चोरी झाल्याची तक्रार राम दशरथ इंदलकर, (रा. कळंबे, ता. सातारा) याने दिली होती. पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी डी.बी. पथकास संशयितांचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे सातारा डी.बी. पथकाने संशयितांचे वर्णन प्राप्त करून तीन संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनी सदरचा गुन्हयाची कबुली दिली.
या आरोपींकडून गुन्हयात चोरीस गेलेली बियरचे बॉटल, गुन्हयात वापरलेली मोटारसायकल व छोटा टेम्पो असे हस्तगत करण्यात आले आहे. या कारवाईत कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजन हंकारे पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार दादा परिहार, पोलीस नाईक सुजीत भोसले, सागर निकम, सतीश पवार, नितीराज थोरात यांनी सहभाग घेतला. या गुन्हयाचा तपास हवालदार लक्ष्मण जाधव तपास करीत आहेत.