प्रतिनिधी /पणजी
सुपरस्टार अमिताभ बच्चनने अखेर ‘नोटा’चे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांची मागणी मान्य केली आणि ‘कमला पसंद’ या पानमसाला कंपनीबरोबर केलेला करार रद्द केला. तसेच कंपनीकडून घेतलेले पैसेही परत केले असून डॉ. साळकर यांनी त्यांचे स्वागत केले आहे. इतर कलाकारांनाही अमिताभ बच्चनचा आदर्श घ्या, असे आवाहन केले आहे.
डॉ. शेखर साळकर हे तंबाखू निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष आहेत व त्यांनी गेली अनेक वर्षे सिगरेट तथा तंबाखूजन्य पदार्थांविरोधी मोहीम उघडलेली आहे. गोव्यात मोठय़ा प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ तथा पानमसाल्यांच्या जाहिराती बेतीला डोंगरावर झळकत आहेत. त्या गोवा सकारने त्वरित काढून टाकाव्यात, अशी मागणी केली आहे. या संदर्भात डॉ. साळकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना एक पत्र लिहिले आहे.
अमिताभ बच्चन ‘कमला पसंद’ पानमसाल्याची जाहिरात करतात. त्या कंपनीकडे त्यांनी करार केला होता. डॉ. शेखर साळकर यांनी बच्चन यांना हा करार रद्द करावा आणि पान, गुटखा यांच्या सेवनाने देशात कर्करोग वाढतोय तेव्हा कृपया आपण हा करार रद्द करावा, अशी मागणी केली असता बच्चन यांनी त्यांची मागणी मान्य करून करार रद्द केला. डॉ. शेखर साळकर यांनी या प्रकाराबद्दल अमिताभ बच्चन यांचे स्वागत केले आहे व व अभिनंदनही केले आहे.
दरम्यान, कदंब परिवहन महामंडळाच्या काही बसेसच्या मागे गुटखा तथा पानमसाल्याच्या जाहिराती आहेत. त्या त्वरित काढून टाकाव्यात, अशी मागणीदेखील डॉ. साळकर यांनी केली आहे.