वृत्तसंस्था/ दुबई
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी आणि जागतिक दर्जाचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने ऑस्ट्रेलियात चालू वर्षी होणाऱया बिग बॅश टी-20 स्पर्धेला कोरोनाची भीती आणि कौटुंबिक कारणास्तव माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलियात बिग बॅश टी-20 स्पर्धेच्या हंगामाला 3 डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून या स्पर्धेतील सलामीचा सामना ऍडलेड स्ट्रायकर्स आणि मेलबोर्न रेनिगेड्स यांच्यात खेळविला जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील ही महत्त्वाची क्रिकेट लीग डिव्हिलीयर्सला प्रमुख दोन कारणामुळे हुकणार आहे. 36 वर्षीय डिव्हिलीयर्स सध्या संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चँलेजर्स बेंगळूर संघाकडून खेळत आहे. गेल्या वर्षीच्या बिग बॅश क्रिकेट स्पर्धेत तो ब्रिस्बेन हिट संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता. गेल्यावर्षीच्या हंगामासाठी डिव्हिलीयर्सने बीबीएलच्या फ्रांचायजीबरोबर करार केल्यानंतर 24.33 धांवाच्या सरासरीने 146 धावा जमविल्या होत्या. सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत डिव्हिलीयर्सची फलंदाजी बहरली असून त्याने 54 धावांच्या सरासरीने आतापर्यंत 324 धावा जमविल्या आहेत. कोरोना महामारीची भीती तसेच या स्पर्धेच्या कालावधीत डिव्हिलीयर्सची पत्नी तिसऱया अपत्याला जन्म देणार आहे. या दोन कारणामुळे डिव्हिलीयर्सने बिग बॅश क्रिकेट स्पर्धेसाठी आपण उपलब्ध होवू शकणार नाही, असे ब्रिस्बेन हिट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाला कळविले आहे.