ऑनलाईन टीम / मुंबई :
बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना कोरोनाची बाधा झाली आहे. स्वतः अनिल थत्ते यांनी एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ते आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतात की, सध्या मी रुग्णालयात असून मला कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवस मला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून मी घरून काम करत होतो. परंतु आज तो व्हायचा तेव्हा होणार तेव्हा होतोच या निष्कर्षाला मी आलो. एवढी काळजी घेऊनही जर कोरोना होणार असेल तर काय म्हणायचं. आता कोरोनाची भीती संपली. तसंच कोरोना सोबत मधुमेह वगैरे अन्य आजार असूनही प्रकृती उत्तम असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, या आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर मी प्लाझ्मा देण्याचाही संकल्प केला आहे.
दरम्यान, सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात शुक्रवारी एका दिवसात 6364 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 92 हजार 990 इतकी झाली आहे. त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 1 लाख 4 हजार 687 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे 8376 जणांनी आपला जीव गमावला आहे.