ऑनलाईन टीम / मुंबई :
बिग बॉस फेम अभिनेता एजाज खानला ड्रग्स प्रकरणात एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणात पेडरल शादाब बटाटा याला अटक केल्यानंतर एजाज खानचे नाव समोर आले होते. त्यानंतर एजाज खान राजस्थानमधून मुंबईत पोहोचल्यावर एअरपोर्टवरच त्याला ताब्यात घेतले. एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात नेऊन त्याची आता चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, एनसीबीने शुक्रवारी केलेल्या कारवाईत मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रग्ज माफियाच्या मुलाला अटक केली. मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटासह अन्य एकाला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. दोन कोटींपेक्षा जास्त किंमतीचे एमडी ड्रग्ज, एक फॉर्च्युनर, एक i20, आणि एक बलोनो अशा 3 कार जप्त केल्या आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली. शादाब बटाटावर मुंबईतील बॉलीवूडमधील सेलिब्रिटींना ड्रग्स पुरवत असल्याचा आरोप आहे.
दरम्यान, एजाझ खानने रक्तचरित्र, अल्लाह के बंदे यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये त्यासोबतच रहे तेरा आशीर्वाद, कहानी हमारे महाभारत की, करम अपना अपना यासारख्या मालिकांमध्येही काम केले आहे.
या अभिनेत्याला ड्रग्स बाळगण्याप्रकरणी अटक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्याला फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे अटक करण्यात आली होती. तर एक्टसी टॅबलेट्सच्या माध्यमातून ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी ऑक्टोबर 2018 मध्येही अटक करण्यात आली होती.