बेळगाववर नितांत प्रेम करणाऱया संभाजी पवार यांच्या आठवणींना उजाळा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्र व कर्नाटकाचा बिजली मल्ल व राजकीय पैलवान म्हणून ओळखले जाणारे व बेळगाववर प्रेम करणारे माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन झाले. बिजलीमल्ल गेल्याने कुस्ती क्षेत्रात दुखवटा पसरला आहे.
पै. संभाजी पवार हे महाराष्ट्राचे. परमेश्वराने दिलेल्या सुंदर शरीरयष्टीबरोबर गरिबांचा कैवारी, जबरदस्त मानसिक बळ असलेला मल्ल म्हणजेच संभाजी पवार उर्फ आप्पा. या आप्पानी ऑलिंपिकपटू बंडा पाटील, राजकुमार दिल्ली, हरिश्चंद बिराजदार, कल्लू मिरत युपी, मुंगा पैलवान बेंगळूर त्याचप्रमाणे हिंदकेसरी चंबा मुत्नाळ यांच्याबरोबर तीनवेळा लढत दिलेला, डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार, रसुल हनिफ, श्रीधर श्रीरंग शिंदे, बेळगावचा प्रसिद्ध मल्ल टोपाण्णा गोजगे, दादू चौगुले अलिबाग, महाराष्ट्र केसरी अलिबिन सय्यद व पांडू सावंत या तुफानी पैलवानांबरोबर लढत दिलेला पैलवान म्हणजेच संभाजी पवार उर्फ आप्पा. संभाजी पवार यांनी केलेल्या वेगवान, चटकदार व आकर्षक कुस्त्यांमुळे त्यांना बिजलीमल्ल म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अलीबिन सय्यद याच्याशी केलेली कुस्ती अतिशय रंगतदार ठरली होती. राजकुमार यांना घिस्सा डावावर केलेले चित, मोळी डावात कुडचीच्या आब्बास पठाणला दोनच मिनिटात दाखविलेले आस्मान, धोबीपछाड डाव मारावा तर संभाजी पवार यांनीच. घिस्सा व पट काढण्यात कोणीही हात धरू शकणार नाही, इतक्मया चपळाईने ते पट काढत होते. तेजदार व्यक्तिमत्त्वाचे संभाजी पवार मैदानात उतरताच मानसिक दबावतंत्र वापरत होते. आकर्षक आणि तेजस्वी व्यक्तीमत्व, जबरदस्त इच्छाशक्ती, हलगीच्या नादात मैदानात प्रवेश करताच विरोधी मल्ल घाबरून जात असत. संभाजी पवार समोरच्या मल्लाचा पवित्रा पाहून त्याला कोणत्या डावावर चित करावे, याची योजना ते लगेच करत होते. त्यानुसारच ते आपल्या कुस्तीला गती देत होते. प्रतिस्पर्ध्याला बेसावध करणारी गतिमानता त्यांच्याकडे होती. विरोधी मल्ल संरक्षणात्मक पवित्रा घेऊन वेळकाढूपणा करत असताना पट काढून त्याच्यावर मात करण्याची कला त्यांच्याकडे होती. नागाने डंख मारावा, अशी संभाजी पैलावानाची मजबूत पकड असायची. अशा बिजली मल्लाचा अस्त 15 मार्च रोजी झाला.
संभाजी पवार तीनवेळा तीनवेळा आमदार झाले होते. बीजेपीला सांगली जिल्हय़ात बळकट करण्यात संभाजी पवारांचा मोठा हात होता. त्यांचे बेळगाववरील प्रेम पाहता सतत बेळगावला चांगल्या कुस्त्या, चांगले मैदान व्हावे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील रहायचे. बेळगावला चांगले कुस्तीचे दिवस यावेत यासाठी जगदीश पैलवाल याला मुतग्याच्या मैदानात आमंत्रण दिले होते. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना मल्ल बनविले. गौतम पवार व पृथ्वीराज पवार यांनीही आपल्या वडिलाप्रमाणे अनेक छोटय़ा मोठय़ा कुस्त्या केल्या आहेत
बेळगावबद्दल जिव्हाळा असणारे बिजली मल्ल : बाळाराम पाटील
एक चित्त्यासारखा चपळ, गरिबांचा कैवारी, तुफानी बिजली मल्ल संभाजी पवार उर्फ आप्पा हे काळाच्या पडद्याआड गेले. बेळगाववर नितांत प्रेम करणारे एक दानशूर व्यक्तिमत्त्व पैलवान संभाजी पवार यांनी लाल मातीशी प्रेम करून जास्तीत जास्त कुस्त्या घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मातीतील कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी खेडोपाडी, शहरात जाऊन कुस्तीबद्दलचा प्रचार करीत कुस्ती जिवंत ठेवली. बेळगावात रखडलेली कुस्ती पुनरुज्जीवित करण्यासाठी जगदीश पैलवान दिल्ली याला मुतग्यात बोलवून मोठे मैदान भरविले. त्यावेळी ते स्वतः जातीने मैदानात उपस्थित राहिले होते. कुस्ती जगविण्यासाठी त्यांनी तरुण भारत कुस्ती आखाडय़ाची स्थापना करून अनेक मल्लांना प्रशिक्षण देत अनेक कुस्त्या भरविल्या. आद्य बजरंग तालमीची स्थापना आप्पानी केली. अशा या बिजली मल्लाला बेळगाव जिल्हा कुस्तीगिर संघटनेतर्फे भावपूर्ण आदरांजली !