प्रतिनिधी /वास्को
सांकवाळ पठारावरील बिटस् पिलानीच्या कॅम्पसमध्ये मागच्या चार दिवसांत 30 विद्यार्थी कोविड बाधीत आढळून आले आहेत. या प्रकारामुळे या संस्थेला पुन्हा ऑनलाईन वर्गांकडे वळावे लागले आहे. कोविड नियमांचे पुन्हा कडकरीत्या पालन करण्याचे आवाहन या संस्थेला प्रशासनाने केले आहे.
गोव्याच्या बिटस् पिलानी कॅम्पसमध्ये कोविडची तिसरी लाट ओसरल्याने देशभरातील मुले फेब्रुवारीत दाखल झाली होती. त्यांच्यासाठी ऑफलाईन वर्गांनाही सुरूवात झाली होती. मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात ऑफलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांच्या परीक्षाही झाल्या. मात्र, चार दिवसांपूर्वीच संस्थेच्या विद्यार्थ्यांमध्ये कोविडची लक्षणे आढळून आल्याने संस्थेला पुन्हा ऑनलाईन शिक्षणाकडे वळावे लागले आहे. या संस्थेत सध्या जवळपास 2900 विद्यार्थी शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत 30 विद्यार्थी कोविड पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आलेली असून त्यांना संस्थेतील त्यांच्या खोल्यांमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे.
बिटस् पिलानी गोवा कॅम्पसचे जनसंपर्क अधिकारी अर्जुन हळर्णकर यांनी यासंबंधी दिलेल्या माहितीनुसार संस्थेतील केवळ 9 विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा एक डोस घेतलेला आहे. उर्वरीत सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या कोविड तपासणीची गरज भासलेली नाही. मात्र, पॉझिटीव्ह विद्यार्थ्यांच्या संपर्कात जे काही विद्यार्थी आले होते अशा काही विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत आहे. संस्था पुन्हा एकदा ऑनलाईन वर्गांकडे वळलेली असून शासकीय आदेशानुसार सर्व कोविड नियमांचे पालन करण्यात येत आहे. संस्थेचे सर्व कार्यक्रम स्थगीत करण्यात आलेले आहेत. आरोग्य खात्याच्या पथकासह बिटस् संस्थेचे आरोग्य सेवा पथकही परीस्थिती योग्यरीत्या हाताळीत आहे व परिस्थिती नियंत्रणात आहे असे हळर्णकर यांनी म्हटले आहे.