कर्नल विजय रावत उत्तराखंडमधून निवडणूक लढविणार
दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे कनिष्ठ बंधू कर्नल विजय रावत (सेवानिवृत्त) भाजपमध्ये सामील होऊ शकतात. त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांची दिल्लीत भेट घेतली आहे. सूत्रांनुसार पुढील काही दिवसांमध्ये देहरादूनमध्ये अधिकृतपणे ते भाजपमध्ये सामील होणार आहे. उत्तराखंडमध्ये 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
भाजपसाठी काम करण्याची माझी इच्छा आह. आमच्या कुटुंबाची विचारसरणी भाजपशी मिळतीजुळती आहे. भाजपकडून सांगण्यात आल्यास निवडणूक देखील लढणार असल्याचे विजय रावत यांनी म्हटले आहे.
बिपिन रावत आणि त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात आलेल्या राष्ट्रसेवेला आम्ही नमन करतो. रावत यांच्या स्वप्नांनुरुप उत्तराखंड साकार करण्याचे कार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री धामी म्हणाले. रावत यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चेमुळे अनेक विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारण्यात येणार असल्याचा संदेश गेला आहे.
8 डिसेंबर रोजी एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि 12 अन्य जणांचा मृत्यू झाला होता. ही दुर्घटना तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये घडली होती.