प्रतिनिधी / कारवार
डिफेन्स स्टाफचे चीफ जनरल बिपीन रावत आणि भारतीय नौसेनेचे वाईस ऍडमीरल आर. हरिकुमार यांनी सोमवारी येथून जवळच्या सीबर्ड नाविकदलाला भेट दिली. बिपीन रावत आणि आर. हरिकुमार यांचे रियर ऍडमीरल महेश सिंग यांनी स्वागत केले. भेटीवेळी रावत आणि हरिकुमार यांनी सी-बर्ड प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी रावत यांना सी-बर्ड प्रकल्प प्रदेशातील नेवल शीप दुरुस्ती यार्डच्या आधुनिकीकरणाबद्दल आणि मेरीटाईम ऑपरेशन सेंटरच्या क्षमतेबद्दल माहिती देण्यात आली. भेटीवेळी रावत आणि हरिकुमार यांनी प्रकल्पस्थळी सुरू असलेल्या वेगवेगळ्या कामांची पाहणी केली सी-बर्ड प्रकल्पस्थळी कार्यरत असलेल्या शीप लीफ्ट सुविधेची पाहणी ही वरिष्ठांनी केली. येथून जवळच्या सी-बर्ड प्रकल्पाचा पहिला टप्पा यापूर्वीच पूर्ण झाला असून दुसरा टप्पा आकार घेत आहे. नाविक बंदराची पाहणी केल्यानंतर रावत आणि हरिकुमार यांनी भारतीय नौसेनेच्या अधिकाऱयांशी आणि जवानांशी संवाद साधला, अशी माहिती सी-बर्ड प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.