वाटेगाव ग्रामस्थांकडून सुटकेचा निश्वास
वाटेगाव / वार्ताहर
वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील खोरी शिवारात शिवाजी गावडे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना मंगळवारी सायंकाळी बिबट्याची मादी व तिचा बछडा ऊसतोड मजुरांना दिसला. मजुरांची चाहूल लागताच तिथून बिबट्या मादीने बछड्याला सोडून पळ काढला. ऊस फड मालकाने याची माहिती वनविभाग दिल्यानंतर ग्रामस्थ आणि वनविभागाने बछडा व त्याच्या आईची भेट घडवून आणली. त्यानंतर बिबट्या मादीचा बछड्याला घेऊन गेल्याचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मंगळवारी सायंकाळी खोरी शिवारातील शिवाजी गावडे यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी मजुरांना बिबट्याची मादी व एक बछडा दिसला. मजुरांच्या ओरडण्याने बिबट्या मादीने बछड्याला सोडून तिथून पळ काढला. गावडे यांनी याची माहिती वनविभागास दिली. वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक अमोल साठे व वनमजूर हे खोरी शिवारात आले. त्या परिसरात बछडा दिसला. त्या ठिकाणच्या लोकांचे प्रबोधन वन कर्मचाऱ्यांनी केले.
|
त्याचबरोबर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मादी व बछड्याची भेट घडून आणण्याची व्यवस्था करुन ट्रॅप कॅमेरे लावले. रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्याने येऊन बछड्याला अलगद उचलून घेवून जातानाचा व्हिडिओ वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरात कैद झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. उपवनसंरक्षक विजय माने, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली शिराळा वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी व कर्मचारी यांनी ही कामगिरी केली.