वार्ताहर/ राजापूर
मागील काही दिवसांपासून शहरातील भटाळी येथून कोदवलीकडे जाणाऱया रस्त्यावर बिबटय़ांचा संचार सुरू असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले. असे असताना मंगळवारी रात्री 10.30 च्या सुमारास राजापूरच्या नायब तहसीलदार दिपाली पंडित राजापूर पंचायत समितीकडे जात असताना शहरातील भटाळी येथील पोलीस लाईन्सच्या बाजूला बिबटय़ाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या असून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.
गेले महिनाभर राजापूर शहरातून भटाळीमार्गे कोदवलीकडे जाणाऱया रस्त्यावर बिबटय़ाचा वावर असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले होते. त्यातच या बिबटय़ाने एका दुचाकीस्वाराचा पाठलागही केला होता. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱयांनी पुढील काही दिवस रात्रीची गस्त घालून बिबटय़ाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला होता. तसेच रात्रीच्यावेळी रस्त्यावरून जाणाऱया नागरिकांना सावध करण्यासाठी फलकही लावले होते.
अशातच राजापूरच्या नायब तहसीलदार दिपाली पंडित या मंगळवारी रात्री 10.30च्या सुमारास राजापूर पंचायत समितीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला आपल्या दुचाकीवरुन निघाल्या होत्या. त्या राजापूर पोलीस लाईनपासून काही मिटर अंतरावर असणाऱया भारत बेकरीच्या भट्टीजवळ आल्या असता तेथील गडग्यावर दबा धरुन बसलेल्या बिबटय़ाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. बिबटय़ा हल्ला करत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यानी दुचाकी पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबटय़ाने त्यांचा पाठलाग केला. यामध्ये त्या दुचाकीवरूनही खाली पडल्या. बिबटय़ाच्या हल्ल्यात त्या बालंबाल बचावल्या असल्या तरी बिबटय़ाने त्यांच्या हातावर पंजा मारल्याने दुखापत झाली आहे. शिवाय दुचाकीवरुन पडल्याने त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. दरम्यान याच रस्त्याने येणाऱया काही पोलिसांना पंडित या रस्त्यात पडल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी त्यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले.
परिसरात कॅमेरे बसवणार
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी सदानंद घाटगे व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. तसेच बिबटय़ाचा शोध घेण्यासाठी या परिसरात कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचेही घाटगे यांनी सांगितले.