राजापुरातील तस्करी प्रकरणाची पाळेमुळे खोदण्यास सुरूवात
वार्ताहर / राजापूर
वनविभागाने बिबटय़ाच्या कातडीच्या तस्करी प्रकरणाची पाळेमुळे खोदण्यास सुरूवात केली आहे. त्यातून या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अजित चंद्रकांत नातू (धाकोरा, ता. सावंतवाडी-सिंधुदुर्ग) या संशयितांकडून आता सांबराची 2 शिंगे व कवटी वनविभागाने जप्त केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून आणखी काही बाबी पुढे येण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
सोमवार 20 रोजी वनविभागाने बिबटय़ाच्या कातडीची तस्करी करणाऱया जयेश बाबी परब, दर्शन दयानंद गडेकर व दत्तप्रसाद राजेंद्र नाईक (सर्व शिरोडा, ता. वेंगुर्ले-सिंधुदुर्ग) या तिघांना राजापुरात ताब्यात घेतले होते. या आरोपींची वनविभागाने चौकशी केली असता त्यांनी बिबटय़ाची कातडी अजित चंद्रकांत नातू यांच्याकडून घेतल्याची कबुली दिली. अजित नातू जयेश परबच्या पिठाच्या गिरणीमध्ये काम करतात व त्याच ठिकाणी त्यांनी बिबटय़ाची कातडी दिल्याची कबुली तीनही आरोपींनी दिली.
त्यानुसार परिक्षेत्र वनअधिकारी, रत्नागिरी व वनविभागाच्या अधिकाऱयांनी बुधवारी अजित नातू याला अटक केली. नातू याची अधिक चौकशी सुरू असताना त्याच्याजवळ आणखी काही वन्यप्राण्यांचे अवशेष असल्याची माहिती उपलब्ध झाली होती. त्यानुसार वनविभागाने अजित नातू यांच्याकडून सांबराची 2 शिंगे व कवटी जप्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून या तस्करी प्रकरणात आणखी काहीजणांचा समावेश असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही कारवाई कोल्हापूर प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, राजापूर वनपाल स. व. घाटगे, लांजा वनपाल दि. †िव. आरेकर, संगमेश्वर वनपाल तौ. र. मुल्ला, राजापूर वनरक्षक सागर गोसावी, कोर्ले वनरक्षक सागर पताडे, साखरपा वनरक्षक गावडे, वनरक्षक वनउपज तपासणी नाका साखरपा संजय रणधीर, वनरक्षक वनउपज तपासणी नाका साखरपा राहुल गुंठे यांनी पार पाडली.
तिघा आरोपींना सशर्त जामीन
या प्रकरणात वनविभागाच्या ताब्यात असलेले जयेश बाबी परब, दर्शन दयानंद गडेकर व दत्तप्रसाद राजेंद्र नाईक यांची वन कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शुक्रवारी राजापूर प्रथम दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता या तिघांनाही सशर्त 15 हजार रूपयांच्या जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपींच्यावतीने ऍड. मिलिंद शामराव चव्हाण यांनी काम पाहिले.