महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा उदेक
प्रतिनिधी/ बेळगाव
योग्य प्रकारे उपचार केले नाहीत म्हणून एका मृत महिलेच्या नातेवाईकांनी बिम्सच्या डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर सिव्हिलमधील डॉक्टरांनी आणि कर्मचाऱयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोरोनामुळे तसेच इतर कारणांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वारंवार मारहाणीच्या घटना तसेच वादावादीचे प्रसंग घडत आहेत. उपचार योग्य प्रकारे मिळत नाहीत म्हणून अनेक वेळा तक्रारी झाल्या. यापूर्वी रुग्णवाहिका जाळण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सोमवारी मध्यरात्री एका डॉक्टर आणि कर्मचाऱयांना मारहाण झाली आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱयांवर कोरोनामुळे ताण वाढला आहे. अचानकपणे रुग्ण दगावत आहेत. मात्र त्यामुळे डॉक्टर व कर्मचाऱयांना मारहाण होत आहे. यामुळे हे कर्मचारी आणि डॉक्टर संतप्त झाले आहेत. आम्ही रात्रंदिवस हे काम करत आहे. असे असताना आमच्यावरच हल्ले होत आहेत. त्यामुळे आम्ही काम कसे करायचे? असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत.
रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे उपचार करणे अवघड जात आहे. अत्यवस्थ झाल्यानंतर रुग्ण दाखल करण्यात येत आहेत. सोमवारी रात्रीही अत्यवस्थ झालेल्या रुग्ण महिलेला दाखल करण्यात आले. दाखल करतानाच तिची प्रकृती गंभीर होती. हॉस्पिटलमध्ये दाखल होताच तिचा मृत्यू झाला. मात्र, नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत गोंधळ घातला. या प्रकरणी फिर्याद दाखल झाली नसल्याचे एपीएमसी पोलिसांनी सांगितले.