22 लाख 26 हजार रुपये जमा : प्रादेशिक आयुक्तांनी मानले आभार
प्रतिनिधी /बेळगाव
येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (बिम्स)च्या विकासासाठी उद्योजकांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत येथील काही उद्योजकांनी 22 लाख 26 हजार रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा सामना करताना बिम्स प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा त्रास झाला. यासंबंधीच्या तक्रारी वाढल्यामुळे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना बिम्सच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी स्वतः बेळगावला यावे लागले. त्याचवेळी त्यांनी बिम्सवरील प्रशासकीय कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी प्रादेशिक आयुक्तांची नियुक्ती केली.
सूत्रे स्वीकारल्यानंतर अम्लान आदित्य बिस्वास यांनी बिम्सच्या कारभारात शिस्त आणण्याचा प्रयत्न सुरू केला. याबरोबरच बिम्सच्या विकासासाठी उद्योजकांनी मदत करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बेळगाव येथील अनेक उद्योजक व कारखानदारांनी मदत दिली आहे.
नुकतीच येथील जिनाबकुल फोर्ज प्रा. लि. कंपनीकडून 4 लाख 56 हजार, जेपीएफ मेटाकास्ट प्रा. लि. या कंपनीकडून 1 लाख 25 हजार रुपये, यन्काईस इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीकडून 1 लाख 20 हजार रुपये, एकसकडून 10 लाख रुपये, नेतलकर पावर ट्रान्समिशनकडून 5 लाख रुपये, डायमंड मेटल स्क्रीन्स प्रा. लि. कडून 25 हजार रुपये अशा एकूण 22 लाख 26 हजार रुपयाच्या देणग्या देण्यात आल्या आहेत.
प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांनी बिम्स कार्यालयात देणग्यांचे धनादेश स्वीकारले. ती रक्कम सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्वांगीण विकासासाठी वापरली जाईल, अशी ग्वाही देत त्यांनी देणगीदारांचे आभार मानले. यावेळी बिम्सचे प्रभारी वैद्यकीय संचालक डॉ. उमेश कुलकर्णी, मुख्य प्रशासकीय अधिकारी आफरीनबानु बळ्ळारी, जिल्हा औद्योगिक केंद्राचे सहसंचालक दोड्डबसवराज आदी उपस्थित होते.