कंत्राटी पद्धतीवरील कर्मचाऱयांचे आंदोलन : पेन्शन देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बिम्स हॉस्पिटलमध्ये मागील दहा-पंधरा वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने 80 हून अधिक सफाई कर्मचारी सेवा बजावत आहेत. मात्र, त्यांना वेतनवाढीसह इतर सुविधा पुरविण्याकडे बिम्स प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. काही कर्मचाऱयांना वयाची अट घालून कमी केले आहे. अशा कर्मचाऱयांना पुन्हा कामावर घेऊन 60 वर्षांवरील कर्मचाऱयांना पेन्शन द्यावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा बिम्स हॉस्पिटल नोकर संघाने आंदोलनाद्वारे केली आहे.
पंधरा वर्षांपासून सेवा बजावणाऱया स्वच्छता कर्मचाऱयांनी कोविड महामारीच्या काळातदेखील जीवाची पर्वा न करता सेवा केली आहे. दरम्यान, कोरोनाकाळात शासनाकडून आलेली मदतदेखील कर्मचाऱयांना मिळाली नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांकडेदेखील तक्रार केली आहे. मात्र, अद्याप कर्मचाऱयांना सुविधा आणि कोविडकाळातील मदत मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचारी हलाखीचे जीवन जगत आहेत. बिम्समधील कर्मचाऱयांना नोकरीत कायमस्वरूपी करून 60 वर्षांवरील कर्मचाऱयांना पेन्शन द्यावी, अशी मागणीही नोकर संघाने केली
आहे.
याप्रसंगी संतोष कांबळे, विठ्ठल तळवार, सुनील बस्तवाडकर, बाळाप्पा वगनंदी, सुनील करोली, सतीश पाच्छापुरे, सिद्दगौडा पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते.