बिम्सचे संचालक विनय दास्तीकोप्प यांची म. ए. समितीला माहिती : बिम्स प्रशासन झाले खडबडून जागे
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बेड्सची संख्या कमी पडत असल्याने गेल्या आठवडय़ात बिम्स प्रशासनाला भेट देण्यात आली होती. त्यावेळी गिरीष दंडगी यांनी 200 बेड्स वाढविणार, असे आश्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता न झाल्याने मंगळवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱयांनी बिम्सचे संचालक विनय दास्तीकोप्प यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱयांची संमती असून उद्यापासून आणखी 200 बेड्स उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली.
बेळगाव जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामानाने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मागील काही दिवसांत बिम्स प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सर्वसामान्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नसल्याने म. ए. समितीने या विरोधात आवाज उठविला आहे. त्यामुळे बिम्स प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना पुरेल इतका ऑक्सिजन साठा असल्याची माहिती दास्तीकोप्प यांनी समिती पदाधिकाऱयांना दिली. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, म. ए. समितीचे मदन बामणे, सागर पाटील, सचिन केळवेकर, संतोष कृष्णाचे, महादेव पाटील, बाळू जोशी यांच्यासह इतर उपस्थित होते.