आणखी एकाला अटक एपीएमसी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना बाधिताच्या मृत्यूनंतर सिव्हिल हॉस्पिटलवर दगडफेक करुन रुग्णवाहिका पेटविल्या प्रकरणी धरपकड सुरुच आहे. शनिवारी उज्ज्वलनगर येथील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 15 वर पोहोचली आहे.
उजेर खलीद मनियार (वय 18, रा. उज्वलनगर) असे त्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. त्याच्यावर भा.दं.वि. 143, 147, 307, 353, 332, 324, 427, 435, 504 सहकलम 149 व 51(बी) द डिझॉस्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005, 2(ए) केपीडीपी ऍक्ट व (3)ऍपीडॅमीक डिसीज ऍक्ट 1897 कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.
बुधवारी 22 जुलै रोजी रात्री सिव्हिल हॉस्पिटलवर हल्ल्याची घटना घडली होती. दुसऱया दिवशी गुरुवारी पोलिसांनी 14 जणांना अटक केली होती. या सर्व 14 जणांना हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्दतेत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणातील आणखी काही जण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सिव्हिल हॉस्पिटल बाहेर या घटनेनंतर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतुकही पोलिसांनी बंद केली आहे. बिम्स् कर्मचाऱयांनी तर आम्हाला संरक्षण द्या, अशी मागणी करीत निदर्शने केली हाती. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे आश्वासन दिल्याने कर्मचाऱयांनी संप मागे घेतला होता. तरीही बिम्स् कर्मचाऱयांच्या मनातील धास्ती कमी झाली नाही.
एखाद्या रुग्णाच्या मृत्यूनंतर आमच्यावर हल्ला होवू शकतो ही भिती त्यांच्या मनात आहे. ही भिती दूर करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी सिव्हिल हॉस्पिटल समोर बंदोबस्त वाढविला आहे. मेडीसीन विभाग व सर्जिकल विभाग या दोन्ही विभागांसमोर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱयांनी तर यापूर्वीच सिव्हिल हॉस्पिटल परिसरात अनावश्यक फिरणाऱयांवर बंदी जाहीर केली आहे.
पोलिसांची धाकधूक वाढली
बिम्स्वरील हल्ला प्रकरणी ज्या 15 जणांना अटक करण्यात आली आहे त्या सर्वांचे स्वॅब घेण्यात आले आहे. न्यायालयासमोर हजर करण्यापूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहे. सध्या ते तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे. मात्र स्वॅब तपासणी अहवाल अद्याप आला नाही. यापूर्वी कॅम्प व काकती पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे या 15 जणांचे अहवाल काय येणार? याची हुरहूर लागली आहे. त्यामुळे साहजिकच अटकेच्या कारवाईत भाग घेतलेल्या पोलीस व अधिकाऱयांची धाकधूक वाढली आहे. रविवारी किंवा सोमवारी हे अहवाल येण्याची शक्मयता आहे.