प्रतिनिधी/ पर्वरी
साल्वादोर दु मुन्दू पंचायत क्षेत्रातील तोर्ड पाटो येथे बुधवारी रस्त्यावर कार अडवून कारचालक विलास मेथर यांच्या अंगावर पेट्रोल मिश्रीत द्रव्य टाकून त्यांना आग लावून मारण्याचा प्रयत्न झाला होता, त्या विलास मेथर यांचा काल गुरुवारी गोमेकॉत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे पर्वरी परिसरातील जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून संपूर्ण गोव्यात खळबळ माजविली आहे. गोव्याच्या इतिहासात आतापर्यंतची अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. या अमानुष व निर्दयी कृत्य करणाऱया नराधमास पोलिसांनी त्वरित अटक करावी, अशी मागणी विविध संस्था व राजकीय नेत्यांनी केली आहे.
साल्वादोर दु मुंदू पंचायत क्षेत्रातील चावडेवर धनवाडी येथे उभारलेल्या इमारतीतील एक फ्लॅट मयत विलास मेथर यानी बिल्डर अल्ताफ हेरगिट्टी यांच्याकडून विकत घेतला होता. त्यामध्ये त्याचे कुटुंब राहत होते. फ्लॅटच्या कागदपत्रांवरुन वाद सुरु होता, असे आता उघड झाले आहे.
बिल्डर अल्ताफकडून कागदपत्रे देण्यास टाळाटाळ
फ्लॅट विकत घेतल्याने कायदेशीर कागदपत्रे बनवून फ्लॅट आपल्या नावे करण्याची मागणी मेथर यांनी केली होती. त्यांच्यासह इतर फ्लॅटमधील लोकही अशीच मागणी बिल्डकरकडे करीत होते. अल्ताफ याने या इमारतीत बेकादेशीर बांधकाम केले होते. तो फ्लॅटधारकांना कायदेशीर कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने मेथर यांनी साल्वादोर दु मुन्दू पंचायत कार्यालयात माहिती हक्क कायद्यानुसार पत्रव्यवहार करुन माहिती मागितली होती. हा पत्रव्यवहार सुमारे एक वर्षे चालू होता, अशी माहिती पंचायत सुत्रांकडून मिळाली आहे.
मेथर व अन्य फ्Ÿलटधारक गेले होते पंचायतीत
अल्ताफ याच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आणि पंचायत योग्य दखल घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मेथर यांनी इतर फ्लॅटधारकांबरोबर बैठक घेऊन 15 फ्लॅट मालकांच्या सहय़ांनिशी आरटीआय कायद्यांतर्गत पंचायतीकडून माहिती मागितली होती. त्यानुसार बुधवार दि. 14 ऑक्टोबर रोजी विलास मेथर व इतर तीन फ्लॅटधारकांनी पंचायतीत सरपंच व पंचायत सचिवांची भेट घेऊन आरटीआयची माहिती आणि बेकादेशीर बांधकामाविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
मेथर यांना वाटेत अडवून कारसह पेटविले
पंचायत सचिवांनी 20 ऑक्टोबर रोजी इमारतीकडे येऊन बांधकामाची पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तिथून फ्लॅटधारक निघून गेले. विलास मेथर हे पंचायत कार्यालय इमारतीत असलेल्या आपल्या आस्थापनात गेले. अंदाजे 1 वाजून 10 मिनीटांनी ते आस्थापन बंद करून घरी जाण्यासाठी जीए 03 5727 या कारने निघून गेले. त्यानंतर तोर्ड पाटो येथे पोहचले असता पूर्वनियोजित कटानुसार मेथर यांची कार संशयिताने वाटेत अडवून त्यांच्यावर पेट्रोलमिश्रीत द्रव्य ओतून त्यांना आग लावून पेटविले. त्यानंतर संशयिताने आपल्या दुचाकीवरून पलायन केले होते.
उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी मृत्यू
वाहनात बसलेल्या मेथर यांच्या अंगावरील कपडय़ांनी पेट घेतला होता. वाहनाचा दरवाजा आतून बंद असल्याने कपडय़ासह शरीर 70 टक्के भाजले होते. प्रसंगावधान राखून त्यानी वाहनाबाहेर शेतात उडी घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. तरीही यात ते बऱयाच प्रमाणात भाजले होते. गंभीर अवस्थेत त्यांना 108 रुग्णवाहिकेतून गोमेकॉत दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच काल गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेत पर्वरी तसेच इतर भागात एकच खळबळ माजली आहे. अशा प्रकारची कृत्ये गोव्यातील शांतताप्रिय लोकांना नवीन आहेत. बिहार, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात घडलेले असले प्रकार सोशल मीडियावर दिसत आहेत. परंतु या लहानशा गोव्यात व राजधानीपासून अवघ्या अंतरावर घडलेले हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे, अशी प्रतिक्रिया विविध संस्था प्रतिनिधींकडून व्यक्त होत आहे.
गुन्हेगारांना त्वरित अटक करा : भाजप
या प्रकरणाचा तपास योग्य रितीने करावा. गुन्हेगारांचा लवकरात लवकर शोध लावून मयताच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी होत आहे. या घटनेची गंभीर दखल पर्वरी भाजप मंडळाने घेऊन मंडळ अध्यक्ष कुंदा चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर अस्नोडकर, अशोक शेट्टी, कान्होबा नाईक, दीपक नाईक यांनी पर्वरी पोलिसांत संध्याकाळी निरीक्षक निनाद देऊलकर यांची भेट घेऊन गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली.
पर्वरी मतदारसंघात गुंडगिरी वाढली असून यापूर्वी शाम फातर्पेकर या तरुणावर दिवसाढवळय़ा हल्ला करून जखमी केल्यानंतर मारेकऱयांनी त्याचे व्हिडिओ प्रसारित केले होते. परंतु पोलिसांनी ते प्रकरण योग्य प्रकारे हाताळले नाही. या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये. विलास मेथर यांच्यावर हल्ला करणाऱयांना अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी कुंदा चोडणकर यांनी केली.
गुरुवारी दुपारी 3 वा. आमदार रोहन खंवटे यांनी पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून्न यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी तपास करून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पर्वरी गट काँग्रेसचे अध्यक्ष शंकर फडते, टिकलो, दीप्तेश नाईक व इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकात येऊन या भ्याड कृत्याबद्दल व पोलिसांनी चालविलेल्या तपास कामाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालू असून लवकरच गुन्हेगारांना गजाआड करण्यात येईल, असे पोलीस सुत्रांनी सांगितले. या प्रकरणी अज्ञात संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांची पथके विविध जागी पाठविण्यात आली आहेत, असे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.
बेकायदेशीरपणा, अन्यायाविरुद्ध लढत होते विलास मेथर
प्राप्त माहितीनुसार मयत विलास मेथर हे मूळ हरमल पेडणे येथील असून साल्वादोर दु मुन्दू पंचायत इमारतीत त्यांनी आस्थापन घेऊन ते चालवित होते. नेहमी त्यांच्याबरोबर यांची पत्नी असायची. परंतु घटना घडली त्याच दिवशी ते एकटेच होते. सदनिकेत ठेकदाराने केलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे होणाऱया अन्यायाविरुद्ध न्याय मिळण्यासाठी झटत होते. 15 फ्लॅटधारकांनी केलेल्या संघटित प्रयत्नासंबंधी बोलणी करण्यासाठी पुढाकार घेत होते. त्यामुळे मेथर यांना धडा शिकविण्यासाठी हे जीवघेणे कृत्य केल्याची चर्चा नागरिकांत चालू आहे. मेथर यांनी पर्वरी येथे दुसरा फ्लॅट घेतला होता. लवकरच ते त्या ठिकाणी कुटुंबासह राहण्यास जाणार होते, त्यापूर्वीच त्यांचा खून करण्यात आला. पर्वरी पोलिसांसाठी हे प्रकरण एक आव्हान बनले आहे.