‘आमदारांना भेटा’ असे आयुक्तांनी सांगितल्याने कामगार अडचणीत
प्रतिनिधी /बेळगाव
विविध मागण्यांसाठी आंदोलन केलेल्या पाणीपुरवठा कामगारांपैकी क्हॉल्वमन व दुरुस्ती कामगारांना कामावर रूजू होण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र बिल कलेक्टर व कार्यालयातील कामगार परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सोमवारी महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांची भेट घेऊन विचारणा केली असता ‘आमदारांना भेटा’ असे आयुक्तांनी सांगितल्याने कामगार अडचणीत सापडले आहेत.
गेल्या 10 ते 15 वर्षांपासून पाणीपुरवठा मंडळाकडे काम करत असलेल्या कामगारांनी सेवेत कायम करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. अनेकवेळा निवेदने देऊनदेखील दखल घेण्यात आली नसल्याने हंगामी तत्त्वावर काम
करणाऱया 359 कामगारांनी कामबंद आंदोलन छेडले होते. तरीदेखील याबाबत तोडगा निघाला नाही.
आंदोलनादरम्यान पाण्यासाठी नागरिकांचे हाल झाले. शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली. त्यामुळे आंदोलन मागे घेऊन कामकाज सुरू करण्याची तयारी हंगामी कामगारांनी दर्शविली. मात्र केवळ व्हॉल्वमन आणि दुरुस्ती काम
करणाऱया कामगारांना रूजू होण्याची परवानगी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी दिली होती.
परवानगी देण्यासाठी महापालिका आयुक्तांचा नकार
बिल कलेक्टर आणि कार्यालयात काम करणाऱया कामगारांना सोमवार दि. 24 पर्यंत प्रतीक्षा करण्याची सूचना केली होती. सध्या जिल्हाधिकारी कोरोनाबाधित असल्याने पाणीपुरवठा विभागाच्या बिल कलेक्टरनी सोमवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. कामावर रूजू होण्याची तयारी असल्याचे सांगून परवानगी मागितली. पण कामावर रूजू होण्यास परवानगी देण्यासाठी महापालिका आयुक्तांनी नकार दर्शविला. कामावर रूजू होण्यासाठी आमदारांना भेटा, असे आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे बिल कलेक्टर पुन्हा अडचणीत सापडले आहेत.
एकमेकांकडे बोट दाखवून परवानगी देण्यास टाळाटाळ
कामावर रूजू होण्याची तयारी दर्शवून जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले होते. त्यावेळीदेखील आयुक्तांना भेटण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली होती. या सूचनेनुसार कामगारांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली असता जिल्हाधिकाऱयांकडे बोट करून आपली जबाबदारी झटकली होती. तर बिल कलेक्टरबाबत देखील आता एकमेकांकडे बोट दाखवून कामगारांना कामावर रूजू होण्याकरिता परवानगी देण्यास टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागात बिल कलेक्टर आणि कार्यालयीन कामकाज करणारे कामगार अडचणीत सापडले आहेत.