ऑनलाईन टीम/तरुण भारत
सध्या जगभरात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन या व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉन या व्हेरियंटचा वेगाने फैलाव होत आहे. या नव्या व्हेरिएंटबद्दल मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही चिंता व्यक्त केली असून जगभरातील नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या अगदी जवळच्या मित्रांनाही कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची लागण होत असल्याने काळजीत असलेल्या बिल गेट्स यांनी ट्विट करत आपल्या फॉलोवर्सना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
बिल गेट्स यांनी ट्विट करत, असं वाटतं होतं की आता सगळं पूर्ववत होईल, पण तसं नाहीये. आता आपण महामारीच्या सर्वात वाईट काळात प्रवेश करणार आहोत. ओमिक्रॉनचा फटका आपल्या प्रत्येकालाच बसणार आहे. माझ्या सगळ्या जवळच्या मित्रांना तो बसला आहे. मी माझ्या सुट्टीचं सगळं नियोजन रद्द केलं आहे. इतर कोणत्याही विषाणूपेक्षा अधिक वेगाने ओमिक्रॉन फैलावत आहे. त्याचा प्रादुर्भाव लवकरच जगातल्या प्रत्येक देशात दिसून येईल. पण सगळ्यात मोठी गोष्ट ज्यापासून आपण अज्ञात आहोत, ती म्हणजे हा विषाणू किती गंभीररित्या परिणाम करू शकतो. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला या विषाणूबद्दल पूर्ण माहिती मिळत नाही, तोवर आपल्याला या विषाणूपासून जास्तीत जास्त खबरदारी घ्यायला हवी. डेल्टापेक्षा निम्मा जरी धोका या व्हेरिएंटमुळे असेल तरी आपण आत्तापर्यंतच्या सगळ्यात वाईट काळात जाऊ. कारण हा विषाणू प्रचंड वेगाने पसरत आहे.