प्रतिनिधी / कोल्हापूर
मोकातंर्गत अटक करण्यात आलेल्या राजस्थान 007 बिष्णोई गँगच्या म्होरक्यासह तिघाविरोधी तब्बल साडेतीन हजार पानाचे दोषारोपपत्र शिवाजीनगर (पुणे) येथील विशेष मोक्का न्यायालय पोलिसांनी शुक्रवारी दाखल केले आहे. हे दोषारोपपत्र पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख व गडहिंग्लज विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूरचे पोलीस उपाधीक्षक किशोर काळे, पेठवडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदिप काळे यांनी त्यांच्या पथकाने सुमारे सहा महिने तपास करुन सबळ पुराव्याअंती दाखल केले.
टोळी प्रमुख शाम उर्फ शामलाल गोधनराम पुनिया उर्फ बिष्णोई, श्रीराम पाचाराम पुनिया बिष्णोई, श्रवणकुमार मनोहरलाल मांजू बिष्णोई अशी अटक केलेल्या 007 बिष्णोई गॅगच्या तिघाची नाव आहेत. या गॅगविरोधी राजस्थानमध्ये खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, लैगिंक अत्याचार, अवैधपणे घातक शस्त्रे बाळगणे आणि या शस्त्राव्दारे गोळीबार करणे, खंडगी, अपहरण, गर्दी मारामारी, दहशत निर्माण करणे, अफू – गांजाची तस्करी करणे या सारखे 32 हून अधिक गंभीर गुन्हे त्यांच्याविरोधी नोंद आहेत.
ही गँग कर्नाटकातील हुबळी येथून 28 जानेवारी रोजी राजस्थान पोलीसांना चकवा देवून, पुणे-बेंगळुरु या राष्ट्रीय महामार्गावरुन बिगर नंबर प्लेटच्या पांढर्या रंगाच्या मोटारीतून पूणे येथे जात होती. तसेच या गँगकडे घातक शस्त्रs असण्याची शक्यता असल्याबाबतची यांची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना मिळाली. त्यांनी याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना सांगून, ही गँग जेरबंद करण्याविषयी किणी टोल नाक्यावर नाकाबंदी करण्यास सांगितले. पोलीस निरीक्षक सावंत आणि त्यांचे पथक, शिरोली पुलाची औद्योगिक वसाहतीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी अन्य पोलीस कर्मचार्याच्या मदतीने सापळा लावला. याचदरम्यान या ठिकाणी बिगर नंबरची पांढर्या रंगाची मोटार आली असता ती मोटार अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोटारीमधील गँगचा म्होरक्याने आपल्याकडील पिस्तूल मधून पोलीसांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारला प्रत्युत्तरादाखल पोलीस निरीक्षक सावंत यांनी केलेल्या गोळीबारमध्ये गँगचा प्रमुख शामलाल पुनिया उर्फ बिष्णोई व श्रावण कुमार मांजू बिष्णोई हे दोघे गोळी लागून जखमी झाले होते.
या गुन्हयात यासर्वाना अटक करुन तपास सुरु केला. तपासादरम्यान या गँगविरोधी राजस्थानमध्ये 32 पेक्षा अधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. त्यावरुन या गँगविरोधी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मोका ) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. या कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख, अपर पोलीस अधीक्षक घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूरचे पोलीस उपाधीक्षक किशोर काळे, पेठवडगावचे पोलीस निरीक्षक प्रदिप काळे यांनी तयार केला. या प्रस्तावाला छाननीअंती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजुरी देत, या गुह्याचा तपास पोलीस उपाधीक्षक काळे यांच्याकडे सोपविला. त्यांनी या गुह्याचा तपास तब्बल सहा महिने करुन आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे प्राप्त करुन, दोषारोपपत्र पुणे (शिवाजीनगर) येथील विशेष मोका न्यायालयात दाखल करण्यासाठी राज्याचे अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेश शेठ यांच्याकडे पाठविले. त्यांनी हे दोषारोपपत्र छाननी अंती मोका न्यायालयात दाखल करण्यास मान्यता दिली. त्यावरुन या गँगविरोधी मोका न्यायालयात शुक्रवारी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
साडेतीन हजार पानाचे हे पहिले देषारोपपत्र
आतापर्यत जिल्हा पोलीस दलाकडून जिह्यातील सुमारे तीन डझनाहून अधिक संघटीत गुन्हेगारी टोळ्याविरोधी मोकातंर्गत कारवाई केली आहे. या कारवाईचे आतापर्यत सुमारे 1 हजार 500 पानाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. पण आतापर्यत मोकातंर्गत कारवाई मधील हे पहिले सुमारे 3 हजार 500 पानाचे दोषारोपपत्र आहे.