ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारमध्ये एकीकडे निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे. त्यातच एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. भाजप पार्टीचे स्टार प्रचारक सैयद शाहनवाज हुसेन यांच्यानंतर आता बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या माझी प्रकृती स्थिर आहे. मागील दोन दिवस मला ताप जाणवत होता. त्यामुळे मी खबरदारी म्हणून पाटणा मधील एम्स रुग्णालयात दाखल झालो आहे. लवकरच मी निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होईन, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा ने भाजपचे स्टार प्रचारक सैयद शाहनवाज हुसेन यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राजीव प्रताप रुडी, सुशील मोदी आणि मंगल पांडे क्वारंटाइन झाले होते. त्यानंतर आता बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.