पटना : बिहारच्या गयामध्ये पोलिसांनी चकमकीमध्ये एक दहा लाखांचे बक्षीस असलेल्या कुख्यात कमांडरसह तीन माओवाद्यांना ठार केले. माओवाद्यांनी या भागात दोन लोकांची हत्या केल्यानंतर पोलिसांनी ही चकमक केली. माओवादी संघटनेच्या इंदल समूहाने शनिवारी रात्री बाराछट्टीच्या माहुवारीमध्ये दोघांना गोळय़ा घालून ठार केले. यावेळी पोलीस व कोब्रा 205 कंपनीची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी माओवाद्यांना घेराव घातला. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून गोळीबार झाल्यानंतर चकमक उडाली. यात झारखंडचे दहा लाखांचे बक्षीस असणारा विभागीय कमांडर आलोक यादव जागीच ठार झाला.
तसेच पाठलाग करून त्याच्या आणखी दोन सहकाऱयांनाही ठार करण्यात आले. सुरक्षा दलाने तिघांचेही मृतदेह हस्तगत करत शस्त्रसाठाही जप्त केला आहे.
चकमकीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, एक पोलीस कर्मचारी आणि इतर दोन गावकरी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी एनएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले आहे. चकमकीची ही घटना छट महापर्वानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या महुवारीच्या ठिकाणी घडल्याचे एसएसपी राजीव मिश्रा यांनी सांगितले. घटनास्थळावरून पोलिसांनी एक एके-47 आणि एक इंसास रायफल तसेच अनेक काडतुसे व अन्य स्फोटक साहित्य जप्त केले. सुरक्षा दलांकडून रविवारीही या भागात शोधमोहीम राबविण्यात आली.