गृहविभाग मुख्यमंत्र्यांकडेच, तारकिशोर प्रसाद अर्थमंत्री
पाटणा / वृत्तसंस्था
सोमवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीशकुमार यांनी मंत्र्यांचे खातेवाटप घोषित केले आहे. त्यानुसार त्यांनी स्वतःकडे गृह, सामान्य प्रशासन, गुप्तचर विभाग आदी खाती ठेवली आहेत. तर नवे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांना अर्थखाते देण्यात आले आहे. आणखी एक उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्यावर पंचायत राज विभागाचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले आहे.
नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात ते स्वतः सोडून 14 मंत्री आहेत. यापैकी सात मंत्रिपदे भाजपला, प्रत्येकी एक हिंदुस्थान आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पक्षाला, तर संजदला 5 मंत्रिपदे देण्यात आली आहेत.
संजदचे विजयकुमार चौधरी यांना ग्रामीण अभियांत्रिकी, ग्रामीण विकास, जलस्रोत, संसदीय कामकाज व सूचना प्रसारण अशी खाती देण्यात आली आहेत. तर याच पक्षाचे मेवालाल चौधरी यांना शिक्षण, शिलाकुमारी यांना परिवहन आणि बिजेंद्र यादव यांना ऊर्जा, नियोजन, ग्राहक कल्याण व अन्न ही खाती देण्यात आली आहेत, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली.
भाजपलाही महत्त्वाची खाती
भाजपचे ज्येष्ठ नेते मंगल पांडे यांना आरोग्य, कला आणि संस्कृती, याच पक्षाचे अमरेंद्र प्रतापसिंग यांना कृषी, सहकार, आणि ऊस व साखर विभाग देण्यात आला आहे. रामप्रीत पास्वान यांच्यावर सार्वजनिक आरोग्य, अभियांत्रिकी खाते सोपविण्यात आले आहे. जीवेश कुमार यांना पर्यटन, खाण आणि कामगार विभागाचे उत्तरदायित्व तर राम सुरत राय यांना महसूल आणि कायदा खाते सोपविण्यात आले आहे. विकासशील इन्सान पक्षाचे संस्थापक मुकेश सहनी यांना पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन विभाग देण्यात आले आहेत. तर हिंदुस्थान आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांचे पुत्र संतोश कुमार सुमन यांना लघुपाटबंधारे आणि अनुसूचित जाती व जमाती कल्याण खाते देण्यात आले आहे.
विधानसभा अध्यक्ष कोण ?
मंत्रिमंडळाचे खातेवाटप घोषित झाले असले तरी अद्याप नव्या विधानसभेचे अध्यक्षपद कोणाला दिले जाणार यासंबंधी निर्णय घोषित झालेला नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर यादव या पदासाठी शर्यतीत आहेत. त्यामुळे त्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आलेला नाही, असे सांगण्यात येते.
पाच दिवसांचे अधिवेशन
खातेवाटप घोषित झाल्यानंतर नूतन मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेण्यात आली. विधानसभेचे पाच दिवसांचे अधिवेशन बोलाविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. अधिवेशनाचा कालावधी नंतर घोषित करण्यात येणार आहे.