नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूंकप झाला आहे. दिवंगत नेते रामविलास पासवान यांचा भाऊ मुख्यमंत्री नितीश कुमारांना जाऊन मिळाल्याने लोकजनशक्ती पार्टीमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे चिराग पासवान या एकटे पडल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे. सहापैकी पाच खासदार काका पशुपती पारस यांच्याकडे गेल्याने बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या सगळ्या घडामोडीनंतर चिराग पासवान काकांची भेट घेण्यासाठी घरी गेले आहेत. याचे काही फोटो देखील समोर आले आहेत.
चिराग पासवान यांच्याकडे लोक जनशक्ती पार्टीची सूत्रं आल्यापासून पाचही खासदार नाराज होते. बिहार विधानसभा निवडणूक जदयू आणि भाजपसोबत न लढत स्वतंत्र लढण्याचा निर्णय चिराग पासवान यांनी घेतल्यानं खासदारांच्या नाराजीत आणखी भर पडली होती. तेव्हापासूनच लोक जनशक्ती पार्टी फूट पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली होती.
खासदार पशुपती पारस यांच्या नेतृत्वामध्ये पक्षातील अन्य चार खासदारही पक्षापासून वेगळे होण्याची तयारी करत आहेत. हे सर्व खासदार जेडीयूच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. पशुपती पारस यांचे नितीश कुमार यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते जेडीयूमध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहेत.
चिराग पासवान यांच्यावर नाराज असलेल्या खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं असल्याचं वृत्त आहे. पाचही खासदार पक्षांतर करण्याच्या वाटेवर असून, असं झाल्यास लोक जनशक्ती पार्टीला मोठा धक्का बसणार आहे.