ऑनलाईन टीम / पाटणा :
लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जमुईचे खासदार चिराग पासवान यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे आढळून आल्याने त्यांनी स्वतः ला आयसोलेट करुन घेतले आहे. चिराग यांनी आरटी – पीसीआर टेस्ट केली असून त्याचे रिपोर्ट येणे अजून बाकी आहे.
चिराग पासवान यांनी आतापर्यंत संपर्कात आलेल्यांना सुरक्षित रहा आणि स्वतःची तपासणी करून घेण्याचा सल्ला देखील दिला आहे. सध्या चिराग पासवान हे दिल्लीमध्ये आहेत. त्यांनी सोमवारी सकाळी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझ्यामध्ये कोरोनाचे सौम्य लक्षण दिसून आल्याने मी आरटी – पीसीआर टेस्टसाठी नमुने दिले आहेत. सध्या मी विलगीकरणात आहे. पुढे ते म्हणाले की, कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आपली टेस्ट करून घ्या आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास तात्काळ उपचार करुन घ्या, असेही सांगितले आहे.
दरम्यान, चिराग पासवान यांना त्यांच्या शुभचिंतकांनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.