ऑनलाईन टीम / बिहार :
बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. इथे गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकाच परिवारातील सात जण गंभीररित्या भाजले. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जखमी दोन जणांना शेजारच्या लोकांनी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णिया जिल्ह्यातील बायसी ठाण्यातील खपडा पंचायतीच्या ग्वालगांवमध्ये सोमवारी संध्याकाळी उशिरा घडली. याबाबतची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले.
पोलीस तपासात त्यांच्या परिचितांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी श्याम यादव यांच्या घरी जेवण बनवण्याची तयारी सुरु होती. घरातील गॅस सिलिंडर पहिल्यापासूनच लीक होत होता. त्यावेळी घरातील एका महिलेने गॅस सुरू करण्यासाठी जेव्हा लाईटर लावला त्याचवेळी सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानतंर जोराचा आवाज झाला. आग लागल्याची माहिती मिळताच जवळपासची लोक धावून आली आणि त्यांनी आग विझविली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.
या सात जणांपैकी पाच जणांचा मंगळवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या मध्ये पाच लहान मुले आहेत. गगन कुमार, रुची कुमारी, अमन कुमार, प्रियांशू कुमार आणि प्रीती कुमारी अशी त्यांची नावे आहेत. तर पिंटू यादव आणि बेबी देवी यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. यामध्ये मृत पावलेले सर्वजण हे एकाच कुटुंबातील आहेत.