ऑनलाईन टीम / पटना :
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना 50 जागा लढवणार आहे. तसेच जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार देणार असल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळेगुप्तेश्वर पांडे चर्चेत आले होते. राजपूत प्रकरणात कोणताही संबंध नसताना मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर त्यांनी आरोप केले होते. डीजीपी पदावरचा माणूस कसा बोलत होता, त्याचा अभिनय कसा होता हे जनतेने पाहिले होते. पांडे बक्सर जदयूच्या तिकीटावर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. आम्ही शिवसेनेचा उमेदवार त्यांच्या विरोधात उभा करून त्यांना शिवसेनेची ताकद दाखवू.
शिवसेनेने 2015 मध्ये बिहारमध्ये निवडणूक लढवली होती. तेव्हा 2 लाख मते शिवसेनेच्या पदरात होती. त्यामुळे या निवडणुकीत महाराष्ट्र सरकारवर आरोप करणाऱ्या पांडेंना आम्ही महाराष्ट्राची ताकद दाखवू, असे देसाई यांनी म्हटले आहे.