ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारची राजधानी पाटणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी एका अज्ञाताने एका व्यावसायिकावर गोळी झाडून त्याच्याकडील 11 लाख रुपये लुटले. ही घटना पाटणामधील मालसलामी स्टेशन अंतर्गतमारुफगंज भागात घडली. आरोपी गोळी मारून फरार झाला आहे.
पाटणा सिटी पोलिस अधीक्षक जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणात 5 आरोपी सामील असून त्यातील दोघे मोटार सायकलवरून आले होते. पुढे ते म्हणाले, या घटनेतील जखमी व्यावसायिक अविनाश कुमार यांना उपचारासाठी पाटणा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अविनाश कुमार हे आपल्याकडील रक्कम बँकेत भरण्यासाठी जात असताना आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला. दरम्यान, पोलिसांनी घटना स्थळावरून 2 काडतूसे जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.