ऑनलाईन टीम / पाटणा :
आजच्या युगात मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्यातील जीवनावश्यक भाग बनला आहे. असे असले तरी बिहार पोलीस महासंचालकांनी एक हटके आदेश जरी केला आहे. या आदेशानुसार बिहार मधील पोलिसांना कर्तव्यावर असताना मोबाईल, टॅब आणि सोशल मीडिया वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
- आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस महासंचालक एसके सिंघल यांनी याबाबतचे एक पत्रक जारी केले आहे. या आदेशात म्हटले आहे की, कर्तव्य निभावत असताना पोलिसांना अनावश्यक मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहेे. तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, पोलीस अधिकारी कर्तव्यावर असताना मोबाईलमध्ये मग्न असतात अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ड्यूटी निभावत असताना मोबाईलचा वापर केल्याने पोलिसांचे कामावर दुर्लक्ष होते. यामुळे पोलिसांची प्रतिमा ढासळत आहे, अशी बाब समोर आली असल्याचे, पोलीस महासंचालकांनी जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे पोलीस महासंचालकांनी ड्युटीवर असताना पोलिसांना मोबाईल, टॅब वापरण्यास बंदी असेल, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
पोलीस अधिकारी आणि शिपाई यांना कर्तव्यावर असताना मोबाईल वापरण्यास मनाई असली तरी विशेष परिस्थितीत मुभा देण्यात आली आहे. यासोबतच या आदेशाची प्रत सर्व पोलीस कार्यालयात पाठवण्यात आली आहे. आदेशाचे पालन न केल्यास कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.