ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच आता बिहारमधील भाजपच्या मुख्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. कार्यालयातील 24 नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 110 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यातील 24 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा देखील समावेश आहे.
बिहारमध्ये यंदा विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाटणातील भाजपच्या मुख्यालयात बैठका घेतल्या जात आहेत. ज्यामध्ये अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. त्यातूनच आता अनेकांना कोरोनाची लागण झाल्याने कार्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर आता संपूर्ण कार्यालय सॅनिटाईज करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, सध्या बिहारमध्ये कोरोना ग्रस्टांची संख्या 18 हजारच्या आसपास आहे. तर आतापर्यंत 134 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात 4922 जणांवर उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत 12364 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.