ऑनलाईन टीम / पटना :
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच राष्ट्रीय जनता दलाचे नेते बिट्टू सिंह यांचे भाऊ बेनी सिंह यांची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. पूर्णिमा जिल्ह्यातील धमदाहा विधानसभा मतदारसंघाच्या सरसी भागात हा प्रकार घडला.
बिहारमध्ये आज 15 जिल्ह्यांमधील 78 विधानसभा मतदारासंघामध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. दरम्यान, धमदाहा विधानसभा मतदारसंघाच्या सरसी भागात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर झालेल्या गोळीबारात बेनी सिंह ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बेनी यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, बिहार विधानसभेसाठी 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात 71 मतदारसंघात तर 3 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यात 94 मतदारसंघात मतदान झाले. आज तिसऱ्या टप्प्यात 78 मतदारसंघात मतदान होत असून, 1204 उमेदवार नशीब आजमावणार आहेत. 10 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.