ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारची राजधानी पाटणा येथील एका गावात झालेल्या लग्नात सहभागी झालेले 96 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर लग्न झाल्यानंतर दोन दिवसातच 30 वर्षीय वराचा मृत्य झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा गुरुग्राममध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. 12 मे रोजी आपल्या लग्नकार्यासाठी तो पाटण्यात आला होता. याच दरम्यान, त्याला तसंच कोरोनाची लक्षणे आढळून आली, परंतु कुटुंबीयांनी त्याची चाचणी न करताच त्याचं लग्न लावून दिले होते. मात्र, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वराची प्रकृती बिघडली आणि त्याला पाटण्यातील एम्स रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मात्र, त्याची कोरोना चाचणी करण्यापूर्वीच त्याचा अंतिम संस्कार करण्यात आला.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच त्याच्या लग्नसमारंभात सहभागी झालेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुरूवातीला 15 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर अन्य 80 जणांचीही कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यानंतर वधूचीही करोना चाचणी करण्यात आली. यामध्ये तिचा अहवाल निगेटिव्ह आला. दरम्यान, या लग्नकार्यादरम्यान कोरोना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे. जिल्हा प्रशासनानं लग्नकार्यात 50 लोकांना सहभागी होण्याची परवानगी दिली होती. परंतु या लग्नकार्यात गावातील शेकडो लोक सहभागी झाले होते.