तीन टप्प्यात होणार निवडणूक; 10 नोव्हेंबरला निकाल
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तीन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात 71 मतदारसंघात मतदान होईल. 3 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यात 94 तर 7 नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यात 78 मतदारसंघात मतदान होणार आहे. 10 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
अरोरा म्हणाले, बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला समाप्त होत आहे. त्यामुळे 243 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. त्यामधील 38 जागा अनुसूचित जाती आणि 2 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात विशेष काळजी घेण्यात येईल. उमेदवारी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं भरता येतील. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारासोबत दोन हून अधिक वाहने येणार नाहीत. निवडणुकीच्या उमेदवारासहीत एकूण केवळ पाच लोक ‘डोअर टू डोअर’ कॅम्पेनमध्ये सहभागी होतील. पाचहून अधिक लोक घरोघरी जाऊन प्रचार करणार नाहीत.
सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. एका वेळी मतदान केंद्रावर 1000 हून अधिक मतदार उपस्थित राहणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. निवडणुकीसाठी 7 लाख सॅनिटायजर्स, 6 लाख पीपीई किट, 6.5 लाख फेस शिल्ड, 23 लाख हॅण्ड ग्लोव्ह्ज आणि 47 लाख मास्कची व्यवस्था करण्यात आल्याचेही अरोरा यांनी सांगितले.