- 10 दिवसांपूर्वी झाली होती कोरोनाची लागण
ऑनलाईन टीम / सिवान :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. दैनंदिन वाढते रुग्ण आणि मृतांच्या संख्येने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता बिहारचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांचे आज (1 मे) कोरोनामुळे निधन झाले आहे.
दुहेरी हत्याकांडात शिक्षा भोगत असलेल्या शहाबुद्दीन यांना 10 दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. संसर्गानंतर त्यांना तिहार तुरूंगातून आधी दीन दयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे, अशी माहिती तिहार तुरूंगाचे कारागृह महानिरीक्षकांनी दिली आहे.
राजदचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन तिहार तुरुंगात एका दुहेरी हत्येप्रकरणात शिक्षा भोगत होते. बुधवारी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना दिल्लीतील दीन दयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांना करोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर शहाबुद्दीनची प्रकृती ठीक असल्याचे तिहार तुरुंग प्रशासनाने म्हटले होते.
शनिवारी सकाळीच त्यांच्या निधनाच्या वृत्तावरून गोंधळ उडाला होता. काही माध्यमांनी त्यांचे निधन झाल्याचे तर काही अफवा असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता तिहार तुरूंगाचे महानिरीक्षक संदीप गोयल यांनी शहाबुद्दीन यांच्या निधनाच्या वृत्ताला दूजोरा दिला आहे. शहाबुद्दीन यांचे कोरोनामुळे दिल्लीतील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी शहाबुद्दीन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांचे कोरोनाच्या संसर्गाने अवेळी निधन झाल्याचे वृत्त वेदनादायी आहे. ईश्वराने त्यांना स्वर्गात जागा द्यावी आणि त्यांच्या कुटुंबाला आणि समर्थकांना दुःख सोसण्याची शक्ती द्यावी. त्यांच्या जाण्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. दुःखाच्या प्रसंगी राजद त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.
2004 मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडात शहाबुद्दीन यांना न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली होती. वसूलीचा पैसा न दिल्याने दोन भावांची हत्या करण्यात आल्याची ही घटना होती. मोहम्मद शहाबुद्दीन यांचा बिहारमध्ये दबदबा होता. ते दोन वेळा आमदार आणि चार वेळा खासदार राहिलेले होते.